मुंबई - कोकणासह राज्याच्या काही भागात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला. चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. ताशी 114 किलोमिटर इतका प्रचंड वेग या वादळाचा असून, यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्माळून पडली आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने, तसेच रेल्वे मार्गावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला असल्याचे पाहायला मिळाले.
घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल
मागील तीन दिवसांपासून कोकण किना-यावर घोंघावणा-या चक्रीवादळाने सोमवारी मुंबईत धडक दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. समुद्रात प्रचंड मोठ्या लाटांची निर्मिती झाली. साडेअकरानंतर वादळासह पावसाचा वेग वाढला. दादर, सायन, हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल, माटुंगा, चेंबूर आदी सखल भागात पाणी तुंबले. रस्त्यावर पाणी त्यात झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली. काही ठिकाणी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. यामुळे घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे मात्र हाल झाले.
ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी कोसळली
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी कोसळली. लोकल सेवेवर याचा परिणाम झाला. काही काळासाठी रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ही झाडाची फांदी दूर केली.
वांद्रे - वरळी सी-लिंक बंद
वादळी वा-यासह मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, सकाळी १० वाजल्यानंतर वरळी- वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.
विमान उड्डानांना विलंब
मुसळधार पाऊस व वाऱ्याचा प्रचंड वेग तसेच ढगाळ वातावरणामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाने सायकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिवसभरात तिनदा विमानांच्या उड्डान वेळेत बदल करण्यात आले.
येथे पाणी साचले
गांधी मार्केट, किंग्जसर्कल, दादर, परळ, हिंदमाता, सायनरोड क्रमांक २४, समाज मंदिर हॉल, प्रतीक्षानगर, ऍन्टोपहिल सेक्टर -७, वांद्रे -नॅश कॉलेज, शेलकॉलनी, चेंबूर, कुर्ला (एसटी आगार) मिलन सबवे आदी ठिकाणी
समुद्राला उधाण
वादळी वा-यासह पाऊस आणि त्यात दुपारी ३. ४४ वाजता समुद्राला भरती आल्याने, समुद्र लगतच्या भागांना लाटांचा तडाखा बसला. वाऱ्याचा वेग ताशी 114 किलोमिटर इतका प्रचंड असल्याने गेट- वे ऑफ इंडिया, नरीमन पॉइंट, दादर चौपाटी, जूहू येथील समुद्र किनाऱ्यावर प्रचंड लाटा उसळल्या. खवळलेल्या समुद्रामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
बस वाहतूक वळवली
दादर, हिंदमाता आदी ठिकाणी पाणी तुंबल्याने शिवाय रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने बसेसची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. वादळी -वा-याचा अंदाज घेऊन, बस वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. रस्त्यात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान उद्या पाहाटेपर्यंत मुंबईत तैक्ते चक्रीवादळाचा प्रभाव राहाणार असल्याचा आंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा - विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांच्या राजीनाम्यावर औवेसी यांची केंद्रावर टीका