मुंबई- मध्यरात्रीपासून शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सखल भागात पाणी साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना प्रवासात नाहक त्रास होत आहे.
मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास दिलासा मिळाला आहे. १० वाजेच्या दरम्यान हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, रात्री पडलेल्या पावसाने सायन रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळावर पाणी जमा झाल्याचे दिसत आहे.
पावसामुळे मध्य रेल्वे २० मिनिटे उशिराने व सावधानतापूर्वक चालविण्यात येत आहे. सायन रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ व ४ च्या रेल्वे रुळावरही काही प्रमाणात पाणी दिसत होते. पाणी निचरा लवकर होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी नाल्यातील पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करणे सुरू केले आहे.