मुंबई - सोमवारी सायंकाळपासून पावसाने मुंबईला झोडपून काढले होते. मंगळवारी दुपारनंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. रात्रीपासून मुंबईत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सतत पाऊस पडत असला तरी मुंबईत अद्याप पाणी साचण्याच्या तक्रारी आल्या नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे मंगळवारी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याने पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना रस्त्यावर उतरून आढावा घ्यावा लागला होता. काल मंगळवार दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईत मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून आज सकाळी 6 वाजेपर्यंत शहरात 28.48 , पूर्व उपनगरात 40.89, तर पश्चिम उपनगरात 42.02 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्हणजे 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दहिसर सबवे येथे पाणी साचल्याने तेथील सुधीर फडके ब्रिज येथून काही काळासाठी वळवण्यात आली होती. मात्र आता येथील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. रात्रभर सतत पाऊस पडत असला तरी अद्याप कोणत्याही ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. बेस्ट आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा कुलाबा हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.