मुंबई - राज्यात पावसाने जोर पकडलेला आहे. त्याबरोबरच मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईची तुंबई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसाचा फटका गणेश मूर्ती शाळेलाही बसलेला आहे. मुंबईत पावसाचा मारा असाच कायम राहणार असून, ९ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.
हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुंबई देखील काही तासापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुंबईतील काही रस्ते जलमय झाले आहेत. वाहतूक देखील काही ठिकाणी खोळंबली आहे. पूर्व उपनगरांमध्ये भांडुप विक्रोळी घाटकोपर या भागातील काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. असाच जर पाऊस सुरू राहिला मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
दोन दिवसांवर गणेशोत्सव -
शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. दोन दिवसांवर गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिल्यास गणेशभक्तांना देखील फटका बसू शकतो.
कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट -
9 सप्टेंबरपासून मात्र पावसाचा जोर कमी होईल. बुधवारी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा,पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. शिवाय घाट भागातदेखील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पाच जणांचा मृत्यू, अद्यापही शोधमोहीम सुरू