मुंबई - प्रजासत्ताक दिनाआधी झूम अॅपद्वारे 'पोएटिक जस्टीस फाऊंडेशन'च्या बैठकीला हजेरी लावल्याची कबुली निकिता जेकब यांनी दिली आहे. या बैठकीला खलिस्तानी समजल्या जाणाऱ्या पोएटिक जस्टीस फाऊंडेशन या संघटनेचे संस्थापक धालिवाल यांचीही उपस्थिती होती. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. या विरोधात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून निकिता जेकबने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार निकिताला ३ आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालायने सामाजिक कार्यकर्ती आणि वकील निकिता जेकबला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. टुलकिट पसरवल्याचा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केला होता. मात्र, आता त्यांना तीन आठवडे दिलासा मिळाला आहे. भारतीय दंड विधानातील देशद्रोहाचे कलम 124(A), समाजातील दोन गटांत तेढ निर्माण करण्याबाबत १५३ (A) आणि गुन्हेगारी कट आखल्यासंबंधीचे कलम १२०(A) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
टुलकिट फक्त माहितीपर हिंसाचाराचा उद्देश नाही -
जेकब यांच्या वकिलांनी मुंबई पोलिसांकडे लेखी उत्तर जमा केले आहे. हे टुलकिट एक्स्टिंक्शन रिबेलियन (XR) इंडियाच्या स्वयंसेवकांनी तयार केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नागरिकांना शेतकरी आंदोलन सहजरित्या समजावे यासाठी तयार करण्यात आले होते, असा दावा जेकब यांनी दाखल केलेल्या उत्तरात केला आहे. बैठकीला हजेरी लावल्याचे त्यांनी मान्य केले असले तरी ग्रेटा थनबर्ग यांच्याबाबतची माहिती शेअर करण्यास नकार दिला. ही टुलकिट फक्त माहितीपर होते. त्याचा हिंसा पसरवण्याशी काहीही संबंध नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे.
निकिता जेकब यांच्या वकिलांचा युक्तीवाद
निकिता जेकब यांच्यातर्फे युक्तिवाद करणारे वकिल मिहीर देसाई यांनी न्यायालयाकडे 4 आठवड्यांचा ट्रांजिट जामीन मागितला होता. तसेच तोपर्यंत जेकब यांना अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली होती. जेकब यांची आधीच पोलिसांनी चौकशी केली आहे. तसेच त्यांच्या घरातून काही कागदपत्र देखील जप्त केली आहेत. या प्रकरणातील आणखी एक याचिकाकर्ते शंतनू मुकुल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. असेही यावेळी आपल्या युक्तीवादामध्ये निकिता जेकब यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
बीडच्या शंतनू मुळूकला दहा दिवसांचा अटकपूर्व जामीन
दिल्ली शेतकरी आंदोलनातील टूलकिट प्रकरणी बीड येथील शंतनू मुळूक यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी शंतनूची असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळावा, यासाठी शंतनू मुळूक याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज सादर केला होता. त्यानुसार शंतनू मुळूकला औरंगाबाद खंडपीठाने दहा दिवासांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
शंतनू लॉकडाऊनपासून होता बीडमध्ये -
शंतनूचे प्राथमिक शिक्षण बीडमध्ये झाले असून त्याने अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. त्याचे वडील हे बीडचे माजी नगराध्यक्ष आहेत तर, चुलत भाऊ सचिन मुळूक हे शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख आहेत. शंतनू पर्यावरणवादी असून इंजिनिअरिंगनंतर त्याने काही दिवस औरंगाबाद येथील एका खासगी कंपनीत नोकरी केली आणि नंतर तो पुण्याला गेला. लॉकडाऊनपासून तो बीडमध्ये होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
काय आहे टूलकिट?
टूलकिट हे एक डिजिटल माध्यम आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही घटनेला किंवा माहितीला प्रोत्साहन कसे देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली आणि त्यावेळी हिंसाचार झाला होता. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिच्या ट्विटमधून टुलकिट चर्चेत आले होते. शेतकरी आंदोलनाबाबत टुलकिट सोशल मीडियावरून पसरवल्याचा आरोप बंगळुरुच्या दिशा रवी हिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुलकिट प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात दिशा रवी एक प्रमुख आरोपी आहे. टुलकिट सोशल मीडियावरून पसरवण्याबरोबरच त्यात दुरुस्ती केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सायबर पोलिसांचे विशेष पथक आरोपीची कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपास करेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता निकिता जेकब आणि शंतनू मुळूकही यातील आरोपी असल्याच्या दिशेने तपास सुरू आहे.