मुंबई - 'लुडो' या मोबाईल गेमविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी आता 8 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कंपनीला प्रतिवादी कसे करण्यात यावे, यासंदर्भात विविध न्यायालयाचे निर्णय आणि अन्य कायदेशीर बाबीची माहिती देण्याबाबत सांगितले आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर व्हीसीमार्फत या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली. 'लुडो' हा खेळ कौशल्याचा नाही तर नशीबाचा खेळ आहे, असे घोषित करण्यात यावे अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
'लुडो' हा मोबाईलवर खेळला जाणारा गेम आहे. हा गेम आता पैसे लावून खेळण्यात येत असून, जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3, 4 आणि 5 अन्वये हा गुन्हा आहे. त्यामुळे या मोबाईल ॲपच्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत मनसेचे पदाधिकारी केशव मुळे यांनी व्ही.पी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान याविरोधात केशव मुळे यांनी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने 'लुडो' हा कौशल्याचा खेळ असल्याचं मान्य करत एफआयआर नोंदवण्याची मागणी फेटाळून लावली.
'लुडो' हा नशिबाचा खेळ असल्याचा दावा
दंडाधिकारी न्यायालयाने कारवाईची मागणी फेटाळल्याने केशव मुळे यांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी वकील निखिल मेंगडे यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली. लुडोसारख्या खेळाचं रुपांतर जुगारामध्ये होत असून, तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीनं हायकोर्टात मांडण्यात आली. लुडोचा डाव हा फासा (डाईस) टाकून त्यावर येणाऱ्या अंकानुसार खेळण्यात येतो. त्यामुळे हा कौशल्याचा खेळ नसून, तो निव्वळ नशिबाचा खेळ आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला.
हेही वाचा - Nipah In Maharashtra : महाबळेश्वरमध्ये वटवाघूळात आढळला अतिविषारी निपाह व्हायरस