मुंबई - राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे यांनी दिली आहे.
रुग्णालयात भेटण्यास परवानगी नाही -
शिवतारे यांनी शनिवारी तालुक्यात दिवसभर विविध कार्यक्रम पार पाडले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरी येऊन त्यांनी जेवण केले. जेवणानंतर दवणेमळा व जवळार्जुन आदी गावांत निर्धारित कार्यक्रमांसाठी निघायची तयारी चालू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याबाबत तात्काळ चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. आत्राम यांना कळविण्यात आले. आत्राम यांनी तपासण्या केल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिवतारे यांचे चिरंजीव विनय यांनी शिवतारे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
विनय शिवतारे म्हणाले, २०१२ साली केलेल्या उपोषणानंतर त्यांची किडनी दुखावली होती. त्यानंतर वरचेवर उपचार करून डॉक्टरांनी किडनीचे कार्य व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी अधूनमधून शिवतारे यांना त्रास जाणवतो. यावेळी मात्र किडनीचे कार्य बिघडल्यामुळे त्याचा परिणाम हृदयावर होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटले. ते अतिदक्षता विभागात असून गुरुवारी सर्व चाचण्यांचे अहवाल पाहून पुढील उपचाराबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत.
विजय शिवतारे यांना भेटण्यास रुग्णालय प्रशासनाने परवानगी दिलेली नसल्याने रुग्णालयात गर्दी करू नये. ते लवकरच त्याच तडफेने कार्यरत होतील, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी सांगितले आहे.