मुंबई - एसएमएसद्वारे पत्नीला तलाक देणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पती पत्नीमधील मतभेद आणि वाद समुपदेशनाने सोडवणे शक्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. कोणत्याही प्रकारे तोंडी तलाक देण्याला केंद्र सरकारने कायदा करुन मनाई केली आहे. तरीही अदनान इकबाल मौलवी यांनी त्यांच्या पत्नीला एसएमएस पाठवून तिहेरी तलाक पद्धतीने तलाक दिला होता.
- पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असे -
पतीने तिहेरी तलाक दिल्यानंतर पत्नीने याला विरोध दर्शवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मौलवीचे लग्न एप्रिल 2015 मध्ये झाले होते. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत राहिले. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार सासू-सासरे आणि पती शारीरिक तसेच मानसिक छळ करत होते. माहेरून दहा लाख रुपये आण अशा स्वरूपाचा तगादा लावत होते. त्यामुळे माहेरी असताना पतीने मला एसएमएसवर तलाक दिला, असे पत्नीने सांगितले.
पोलीस अटक करू नये म्हणून आरोपीने दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?