मुंबई - फिल्म निर्माती आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राऊत गेली आठ वर्षे आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत माझ्यासह कुटुंबीय व नातेवाईकांवर अत्याचार करत आहेत, असा आरोप स्वप्ना पाटकर यांनी याचिकेत केला होता. त्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर आज संजय राऊतांविरोधातील तक्रारीची चौकशी करून उत्तर देऊ, तसेच पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहे. तपास करण्यासाठी थोडा अवधी हवा आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांकडून न्यायालयात देण्यात आली. तर संजय राऊतांविरोधात न्यायालयात दाद मागितल्यानंच बोगस डीग्रीच्या खोट्या प्रकरणात अटक केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई उच्च न्यायालय आता 1 जुलैला या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
स्वप्ना पाटकर यांच्यावरील आरोप -
39 वर्षीय स्वप्ना पाटकर यांना क्लिनिकल सायकोलॉजीची बनावट पीएचडी डिग्री मिळवून रुग्णालयात नोकरी मिळवण्याप्रकरणी अटक केली होती. 26 मे रोजी मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात कलम 419 (वेषांतर करून फसवणूक), 420 (फसवणूक), 467 आणि 468 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
कागदपत्रांनुसार, छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ कानपूर येथील 2009 मध्ये जारी केलेले पाटकर यांचे पीएचडी प्रमाणपत्र बनावट असल्याचे लक्षात आले.
संजय राऊत यांच्यावरील आरोप -
शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेली आठ वर्षे आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत आहेत. माझ्यासह कुटुंबीय व नातेवाईकांवर अत्याचार करत आहेत.
स्वप्ना पाटकर यांनी आरोप केले की, 2017 मध्ये संजय राऊत यांनी स्वत: फोनवरून धमकी दिली होती. तसेच 2018 मध्ये एका व्यक्तीमार्फत स्वप्ना पाटकर यांचा पाठलाग करायला लावला होता. स्वप्नाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे सोशल मीडिया हँडल हॅक केले होते. कधी सुसाईड नोट्स तर कधी अश्लील माहिती पोस्ट केली जात, असे आरोप स्वप्ना पाटकर यांनी केले आहेत.