मुंबई - पोलिसांचे आयुष्य खडतर असते. त्यांना स्वतःच्या आवड-निवडीवर लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नसतो. त्यांना गुन्हेगारीचा बीमोड आणि नागरिकांना सहकार्य करताना कामाचा प्रचंड ताण येतो. मात्र, हाच ताण कमी करण्यासाठी हवालदार संजय मोरे चित्रकलेचा मार्ग स्वीकारला आहे.
ताडदेव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे हवालदार संजय मोरे यांना अनेक कला अवगत आहेत. चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, गायन आणि अभिनय या कलेत त्यांना विशेष आवड आहे. त्यांच्या अंगी असणाऱ्या या विविध कलाकारीचे नेहमीच विविध स्तरांतून कौतुक केले जात असते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्यासह निसर्गरम्य अशी २०० पेक्षा जास्त चित्रे त्यांनी रेखाटली आहेत.
मोरे फक्त चित्रेच काढतात, असे नाही तर ते गाणीही चांगली गातात. मिमिक्री करतात. मला टेन्शन आले, की मी चित्र काढतो. त्याने मला मानसिक समाधान मिळते. लहानपणापासून मी चित्र काढत आहे. आता पोलीस कामातून वेळ बाजूला ठेवून मी चित्रे काढतो, असे मोरे सांगतात. नुकतेच त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे चित्र साकारले. आता गणेश चतुर्थीनिमित्त ते स्वतः मूर्ती बनवणार आहेत. अंगातील कला शांत बसू देत नाही, असे मोरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.