मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित तरुणीवर अत्याचार झाले आहेत. नराधमांनी केलेल्या मारहाणीत त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या पीडित कुटुंबाला 25 लाख रुपये आर्थिक मदत, कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश हाथरस येथील एका तरुणीवर बलात्कार झाला होता. तिची जीभ कापण्यात आली होती. या पीडित मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची सर्वत्र निंदा केली जात आहे. या पीडित कुटूंबाला भेटायला जाणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. हे प्रकरण ताजे असताना या पीडित कुटुंबाची मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान आठवले यांनी आपल्या मंत्रालयाकडून 5 लाख रुपयांची मदत दिली आहे. ही रक्कम येत्या दोन दिवसात त्यांच्या अकाउंटवर जमा होईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.
दलित अत्याचार विरोधी कायद्यात अशा कुटूंबाला 25 लाख रुपयांची मदत, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे असे म्हटले आहे. त्यानुसार या कुटूंबाला 25 लाख रुपये आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देऊन त्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.