मुंबई - काल (दि. 10 जानेवारी)रोजी एसटी कर्मचाऱ्यांचा गेली दोन महिन्यांपासून चाललेल्या संपाबाबत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटी कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते. ( Sharad Pawar appeal to ST employees ) दरम्यान, यावर भाजप आमदार राम कदम यांनी या बैठकीचा एक व्हिडीओ ट्विट (Ram Kadam tweet) करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा चार्ज शरद पवारांना दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय आहे ट्विटमध्ये
मागील दोन महिन्यापासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्याने ते प्रत्यक्षात कुठल्याही बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. तसेच, मंत्रालयातही ते फिरकले नाहीत. याच विषयावरून भाजपने वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. आत्ताच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्येही मुख्यमंत्री अनुपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची कायम चर्चा सुरू आहे. एकीकडे मुख्यमंत्री गैरहजर असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचे मंत्री वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा, बैठका करून राज्यातील प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एसटी कर्मचारी संपावरच्या बैठकीत शरद पवार हे प्रमुख मार्गदर्शक होते. हाच धागा पकडून भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत या बैठकीचा व्हिडिओ ट्विट करत असे सांगितले आहे की, "मुख्यमंत्र्यांनी त्यांचा स्वतःचा चार्ज शरद पवारांकडे दिला आहे का? संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? आणि शरद पवारांना बैठका घ्यायच्याच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत? असही कदम यावेळी म्हणाले आहेत.
शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत?
मुख्यमंत्र्यांची राज्याच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत अनुपस्थिती हा भाजपसाठी फार मोठा विषय झालेला आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसेल तर ती आम्ही समजू शकतो. परंतु, त्यांनी त्यांच्याकडील पदभार कोणाकडे तरी सोपवावा अशी मागणीसुद्धा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. इतकेच नाही तर मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी पदभार सोपवावा असही भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून शिवसेना व भाजपमध्ये शाब्दिक चकमक रंगली होती. आता या सर्व बाबी पाहता राम कदम यांचे ट्विट एक नवीन प्रश्न निर्माण करतो. यावरून सध्या राज्यात शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भूमिका तर निभावत नाहीत ना? अशी शंका निर्माण झाली आहे.
हेही वाचा - Lata Mangeshkar Corona Positive : भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण