मुंबई - सीबीएसई अभ्यासक्रमाच्या २४ शाळा मुंबईत सुरू होत आहेत. या शाळांमधून दर्जेदार आणि मोफत शिक्षण दिले जाणार आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पवई येथील तुंगा व्हिलेजमधील सीबीएसई शाळेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दिलीप लांडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, राहुल कनाल, झकारिया, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उप शिक्षणाधिकारी संगीता तेरे यावेळी उपस्थित होत्या.
स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्ड
पवईमधील तुंगा व्हिलेज येथील ३६० विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आलेले १९२८ अर्ज पालिकेकडे आले होते. ही बाब विचारात घेत, पुढील काळात सुद्धा दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका कटिबद्ध आहे. भविष्यात मुंबई महापालिका शाळांमध्ये आयबीच्या शाळा सुद्धा सुरू केल्या जातील. या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाईल. तसेच प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु केली जाईल अशी ग्वाही मंत्री ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच २४ वस्तूचे विनामूल्य वाटप, खेळांमध्ये फिफासोबतचा करार आदी सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका सक्षम असल्याचे ते म्हणाले. कोरोना अद्याप गेलेला नाही. नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची सूचनाही मंत्री ठाकरे यांनी दिल्या.