मुंबई - बसच्या गर्दीला कंटाळलेल्या, लोकलमध्ये नो एन्ट्री असलेल्या आणि नाइलाजाने रिक्षा-टॅक्सीसारख्या महागड्या पर्यायांचा वापर करणाऱ्या मुंबईकरांना अखेर आज राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मागील सात महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो 1 सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर नेमकी कधी मेट्रो 1 सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. त्यानुसार अखेर मुंबई मेट्रो वन सोमवार 19 ऑक्टोबरपासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणार आहे. सोमवारी सकाळी साडे आठ वाजता पहिली मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
राज्य सरकारने आज मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एमएमओपीएल या आधीच मेट्रो सुरू करण्यासाठी तयार होती. मेट्रोच्या दैनंदिन चाचण्या होत होत्या. तर कॊरोना-लॉकडाऊनच्या काळात आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सर्व ते बदल या आधीच करून घेण्यात आले होते. मेट्रो गाड्या, मेट्रो स्थानकातही अनेक बदल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत.आता येत्या सोमवारपासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली आहे.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोने काही नवीन बदल केले आहेत. मेट्रो केवळ 50 टक्के प्रवासी क्षमतेनेच धावणार आहे. प्रत्येक डब्यात केवळ 50 टक्केच प्रवासी असणार आहेत, प्रवाश्यांना एक सीट सोडून बसने बंधनकारक असणारे. मेट्रोसाठी पूर्वी असणारे प्लॅस्टिकचे टोकन आता बंद करण्यात आले आहे. त्याच्याऐवजी आता मोबाईल क्यूआर कोडचा वापर होणार आहे. प्रत्येक प्रवाशाचे स्क्रिनिंग केले जाणार आहे.