मुंबई - कोरोना उद्रेकानंतर उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत राज्यातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी संस्थांनी गोरगरीबांना अन्नदान, औषधी, जीवनावश्यक सामग्री, गावी जाण्यासाठी वाहनव्यवस्था पुरवून असामान्य सेवा केली. गोरगरीब आणि दिनदुबळ्यांची सेवा ही खरी ईश्वरसेवाच आहे. अशा प्रकारे सर्वांनी करुणा जागविल्यास करोना संकटावर धैर्याने मात करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करोना काळात विविध प्रकारे सेवाकार्य करणाऱ्या १८ सेवाभावी संस्थांचा राजभवन येथे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. लोढा फाउंडेशनच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. निराकारी परमेश्वर कधी गरीब बनून, तर कधी याचक रूपाने, तर कधी रुग्ण होऊन आपल्यासमोर येत असतो. अशावेळी समोर आलेल्या गरजू व्यक्तीची सेवा हीच परमात्म्याची पूजा असते असे सांगून, सेवा कार्य सातत्याने करण्याचे आवाहन राज्यपालांनी सर्व सेवाभावी संस्थांना केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उद्बोधन यावेळी राज्यपालांच्या हस्ते श्रीमद राजचंद्र मिशन, धरमपूर, 'जितो' वाळकेश्वर, जिओ, दिव्यज फाउंडेशन, दोस्ती कामाठीपुरा, पंचमुखी सेवा संस्था, राजस्थानी महिला मंडळ, श्री हरि सत्संग, विठ्ठल रुक्मिणी मंदीर, मेटल एंड स्टेनलेस स्टील मर्चंट्स असोसिएशन, बीएपीएस स्वामीनारायण मंदीर, लोढा फाउंडेशन, अट्टारी वेल्फेअर असोसिएशन, क्वेस्ट फाउंडेशन, आरजू फाउंडेशन, अरज व भारतीय जैन संघटना या संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार पराग शाह, मंजू लोढा, डॉ. बिजल मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय खलबते; कंगना संदर्भात सावध भूमिका घेण्याची पवारांची सूचना