मुंबई - राज्यभरात मंदिरे खुली करण्याची मागणी करत भाजपातर्फे आज सर्वत्र आंदोलने करण्यात आली. याच मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून त्यांनी सरकारला मंदिरांच्या मुद्द्यावरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
1 जूनपासून तुम्ही राज्यभरात सर्व व्यवहार पूर्वपदावर येतील, असे सांगितले. याचसोबत 'अनलॉक'दरम्यान सर्वकाही सुरू होण्यासंबंधी अनेक घोषणाही केल्या. मात्र आता तुम्ही या तारखा पुढे ढकलल्या आहेत. राज्यभरातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे अद्याप बंद आहेत. 11 ऑक्टोबरच्या घोषणांमध्ये हे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
सरकारने एका बाजूला बार, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, समुद्रकिनारे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूस सरकारने मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे अद्याप बंद ठेवली आहेत. हा विरोधाभास आहे. तुम्ही स्वत: हिंदुत्ववादी आहात. तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार वाटतो. मात्र आता तुम्हीच धर्मनिरपेक्ष झालात का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनी आणखी एक पत्र लिहून माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.