मुंबई - आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यामध्ये वाढत्या कोरोनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याचवेळी राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीबाबतचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या राज्यामध्ये वाढताना दिसत आहे. खासकरून मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, नवी मुंबई या शहरी भागांमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या मास्कसक्ती नसली तरी, प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. इतर मंत्र्यांकडूनही सातत्याने याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने होणारी शहरी भागातील रुग्णवाढ पाहता आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कसक्ती पुन्हा एकदा केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज सायंकाळी 4 वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे.
शाळा सुरू होण्याबाबतही होणार चर्चा - राज्यामध्ये 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत देखील चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होऊ शकते. गेल्या दोन वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू होत्या. यावर्षी नियमित शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळेबाबत काही महत्त्वाचे निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाऊ शकतात.