मुंबई - राज्यात 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या इमारतीवर भगवा झेंडा व इतर वस्तू ठेवून शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा, असे राज्य शासनाकडून पत्रक काढण्यात आलेले आहे. राज्य शासनाचे हे पत्रक संविधानाला खीळ बसवणारे असल्याचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिवराज्याभिषेक दिनाच्या मुद्द्यावर वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसून येत आहे.
इंडियन फ्लॅग कोड 2002 च्या नियमांचे उल्लंघन -
शासकीय कार्यालयांवर भारतीय ध्वज वगळता कुठलाही ध्वज हा शासकीय कार्यालयांवर चढवला जाता येत नाही, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेले आहे. राज्य सरकारला या गोष्टीची पुरेपूर जाणीव असून एका विशिष्ट समाजाच्या किंवा मराठा संघटनांच्या दबावापुढे झुकून शासनाने अशा प्रकारचे पत्रक काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे इंडियन फ्लॅग कोड 2002 च्या नियमांची पायमल्ली होत असल्याचेही सदावर्तींचे म्हणणे आहे. तसेच हे देशद्रोही कृत्य असून ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे आदेश दिले आहेत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
अन्यथा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार -
शिवराज्याभिषेक दिनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीवर भारतीय ध्वज वगळता कुठलाही ध्वज लावला जाऊ नये व यापुढे जाऊन येणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही विशिष्ट समुदायाकडून जर अशा प्रकारची मागणी केली जात असेल तर ती मान्य करू नये, अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. यासंदर्भात आपण तक्रार केलेली असून त्याविषयी जर कारवाई झाली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचेही म्हणाले.