मुंबई - ग्लोबल टीचर पारितोषिक विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबाबत कोणताही चुकीचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेतला जाणार नाही, असा शब्द दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे डिसले गुरुजी यांच्यावर झालेल्या सर्व आरोपाची पुन्हा एकदा शहनिशा करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण - डिसले गुरजींनी तीन वर्ष शाळेत उपस्थित न राहून देखील पगार घेतल्याचा आरोप शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आणि डिसले गुरजींचा वाद विकोपाला गेला आहे. त्या वादातूनचे डिसले गुरुजी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डिसले गुरुजी यांनी सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
भाजपनेते गिरीश महाजन यांनी केली मध्यस्थी - डिसले गुरुजी हे राजीनामा देणार असल्याचे वृत्त कळल्यानंतर त्यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी संपर्क साधला. तसेच संपूर्ण प्रकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालण्यात आले होते. त्यानंतर डिसले गुरुजी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बोलावले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डिसले गुरुजी यांची संपूर्ण बाजू ऐकून घेतली. तसेच या सर्व प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलून कोणताही चुकीचा निर्णय होणार नाही याबाबत दिसले गुरुजी यांना शाश्वत केले.