मुंंबई - राज्यातील कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरचे हुतात्मा जवान भूषण सतई यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार पार पडले. १३ नोव्हेंबरला श्रीनगर येथील गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. यामध्ये महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण आले होते. दोघांवरही त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
काटोल, नागपूर
हुतात्मा जवान भूषण सतई यांच्यावरकाटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री भूषण यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूरला आणण्यात आले होते. रात्रभर पार्थिव कामठी येथील गार्ड रेजिमेंट येथे ठेवण्यात आले. लष्कराकडून मानवंदना दिल्यानंतर आज भूषण यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसागर लोटला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सुनील केदार आणि नितीन राऊत हे देखील उपस्थित होते.
आजरा, कोल्हापूर
आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीरपुत्र ऋषीकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषीकेश यांचे चुलत भाऊ दीपक जोंधळे यांनी ऋषीकेषच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सीमेवर लढताना वीरमरण आलेला पूत्र आज अनंतात विलीन झाला.
हेही वाचा : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत सात ठार
जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्यात बहिरेवाडीचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले. ऋषीकेश यांचे पार्थिव आज पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झाले. यावेळी मराठा बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली. सकाळी साडे सातच्या सुमारास बहिरेवाडी या ऋषीकेश यांच्या मूळगावी पार्थिव आणण्यात आले. त्यांच्या घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. अवघ्या वीस वर्षांच्या या जवानाचे अंत्यदर्शन घेताना अनेकांच्या अश्रूंना बांध फुटला. त्यानंतर गावात अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी 'ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सीमेवर लढताना वीरगती
13 नोव्हेंबरला श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यावर चालून आले. हा हल्ला परतवताना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत काही पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. मात्र महाराष्ट्रातील दोन जवान यामध्ये कामी आले. सीमेवर देशाचे संरक्षण करताना दोघांना वीरमरण आले. सीमेवर वातावरण तापल्याने त्यांचे मृतदेह घरच्यांना सुपूर्द करण्यात वेळ लागला. अखेर आज सकाळी दोघांवरही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. तसेच सर्व उस्थितांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या.
भारताच्या या वीर जवानांना 'ईटीव्ही' परिवाराकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली!