मुंबई - विक्रोळी पार्कसाईट परिसरातून शालेय पोषण आहार (मिड-डे मिल) योजनेअंतर्गत शासनाकडून पुरवण्यात आलेल्या तांदळाचा अपहार करणाऱ्याला घाटकोपर गुन्हे शाखा सातने अटक केली.
हेही वाचा - 'कचऱ्यावरील खर्च करणार तीन पट कमी'
विक्रोळी पार्कसाईट परिसरातील हनुमान नगर येथील अंबिका धान्य भांडार या दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात बेकायदेशीररीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासकीय अनुदानमध्ये पुरवलेला एकूण 24 गोण्या मिळाल्या आहेत. एकूण 1 हजार 187 .5 किलो वजनाच्या या तांदळाची किंमत 19 हजार रुपये आहे.
सदर दुकानमालकाला नमूद तांदळाबाबत विचारणा केली असता, तांदूळ त्यांनी हनुमान नगर पार्कसाईट विक्रोळी पश्चिम येथील श्रेया महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या प्रकरणांमध्ये गुन्हे शाखेनी अंबिका धान्य भांडारचे मालक व महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी तांदळाचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अंबिका धान्य भंडार दुकानाच्या मालकाला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.