मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील झोपडपट्टी परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. या विरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईमध्ये चार बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना गेल्या अनेक वर्षांपासून हे चार बोगस डॉक्टर मुंबईतील सायन परिसरामध्ये बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रावरून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चालवत होते.
सार्वजनिक शौचालय रेल्वेस्थानक अशा ठिकाणी गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या नावाखाली स्वतःची जाहिरात हे बोगस डॉक्टर करत होते. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी राकेश रघुनाथ तिवारी (वय 44), दलसिंग सीताई यादव (वय 59), मोतीलाल विदेशी मौऱ्या (वय 51), अनिलकुमार जगदीश प्रसाद बिंद (वय 41) या चार बोगस डॉक्टरांना अटक केली आहे.
केवळ 12 वी पर्यंत शिक्षण झालेले हे चारही आरोपी सायन पूर्व परिसरातील झोपडपट्टीमध्ये स्वतःचा दवाखाना चालवत होते. हे चारही बोगस डॉक्टर एलोपॅथीद्वारे रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी इंजेक्शन्स व काही गोळ्या हस्तगत केल्या आहेत. कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ यांनी स्वतःचा बोगस बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 4 ने यापूर्वी मुंबई परिसरातून 11 बोगस डॉक्टरांना अटक केलेली आहे. आता या चार डॉक्टरांना अटक झाल्यानंतर एकूण 15 बोगस डॉक्टरांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.