मुंबई - उशीर होतोय म्हणून घाईने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांनी सरासरी गुण देणे हिताचे ठरणार नसल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. डी. सावंत यांनी व्यक्त केले आहे. आत्ता विद्यार्थ्यांना पास केल्यास पुढील करिअर आणि शिक्षणासाठी हा प्रकार अडचणीचा ठरेल, असे ते म्हणाले. विदेशातीलच नाही, तर आपल्या देशातील विद्यापीठेही सरासरी गुण स्वीकारणार नाहीत, असे सावंत यांनी सांगितले.
परीक्षा घेणे, निकाल लावणे ही खरंतर विद्यापीठांची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने ही जबाबदारी विद्यापीठांवरच सोपवावी; आणि आवश्यक मदत पोहोचवावी. मात्र, अशा कठीण काळात विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील परीक्षांसंदर्भात बोलताना शिक्षण तज्ज्ञ सावंत यांनी जगभरातील परिस्थितीचे उदाहरण दिले. कोलंबिया विद्यापीठामध्ये विशेष पद्धतीने सोशल डिस्टन्सचे पालन करून परीक्षांचा विषय मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपणही अशा पद्धतीचा विचार केले पाहिजे. पण उशिर झाला म्हणून घाई न करण्याचे आवाहन सावंत यांनी केले.
जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोष्टी निवळण्यासाठी आणखी वेळ देणे आवश्यक आहे. या वेळेत मागील सत्रासाठी असणाऱ्या ऑनलाइन अनेक पर्यायांबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. विविध प्रकारचे क्रॅश कोर्सेस चालवून मागील अभ्यासक्रम पूर्ण केल्यास पुढील परीक्षांच्या अंतिम निकालाचा मार्ग सुकर होईल, असे मत माजी कुलगुरू सावंत यांनी व्यक्त केले आहे.
माजी कुलगुरू सावंत यांनी सुचवलेले उपाय
शासनाने विद्यार्थ्यांची क्षमता त्यांच्यात कार्यकुशलता लक्षात घेऊन परीक्षा कशा घेता येतील याबद्दल विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. विद्यापीठानेही शासनावर फार अवलंबून राहू नये. विद्यापीठांची स्वायत्तता आहे. त्यांना ती पणाला लावू द्यावी. विद्यापीठांना मदत पाहिजे तेव्हा शासनाने पुरवावी.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बहुतेक करिअरचा विचार करणारे विद्यार्थी आता परदेशात जाऊ शकत नाहीत. ते मार्ग सध्या बंद आहेत. महामारीमुळे परदेशात सर्व कामकाज बंद आहे. परीक्षा रद्द होऊन सरासरी गुण मिळालेले विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थांमध्ये गेल्यानंतर त्यांना प्रमोटेड विद्यार्थी म्हणून गणले जाईल; आणि यामुळे नामुष्की ओढावली जाईल.
आता जे मागील वर्ष आहेत त्या वर्षासाठी ऑनलाईन शिक्षण त्यांनी सुरू ठेवावं. पुढच्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम ठरलेलाच आहे, त्याप्रमाणे नियोजन करावे.
हे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले, तर जेव्हा वाहतूक व्यवस्था आणि इतर भाग सुरळीत होईल तेव्हा त्यावेळी परीक्षा घ्याव्यात. त्यासाठी आपल्या सोयीप्रमाणे परीक्षा घेता येतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही. एकीकडे अभ्यासक्रम सुरू राहील आणि यातून मार्ग निघेल.