मुंबई - हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी विभागात प्रतिनिधीत्व करत असलेल्या नगरसेविका व माजी उपमहापौरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कुर्ला येथील एका नगरसेवकालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही नगरसेवक पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आहेत. नागरिकांना सुविधा पुरवताना त्यांना कोरोना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत कोरोनाचे शेकडो रुग्ण रोज आढळून येत आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी कंटेंनमेंट झोन असल्याने विभाग सील केले आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अन्नधान्य पोहचवण्याचे काम नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींमार्फत केले जात आहे. तसेच नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून नगरसेवक कामाला लागले आहेत.
मुंबईत वरळी विभागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याच विभागात कोळीवाड्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका व मुंबईच्या माजी उपमहापौर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांपूर्वी कुर्ला साकिनाका एल.बी.एस मार्ग या विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. त्यांनी घरीच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला मात्र रविवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या नगरसेवकाच्या कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले असले तरी त्यांच्या कुटुंबातील दोन ते तीन सदस्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांची चाचणी केली जाणार आहे.
नगरसेवकांच्या चाचण्या -
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सर्व नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबांची फिव्हर क्लिनिकमार्फत तपासणी करून त्यात ज्याला लक्षणे आढळून येतील, त्यांची कोरोनाची चाचणी खासगी लॅबच्या माध्यमातून करण्यात यावी, असे निर्देश पालिका उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या टेस्टमधून हे नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.