मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांना सुशांतच्या तीन बँक खात्यांचा 'फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट' प्राप्त झाला असून यात कोणत्याही प्रकारची अफरातफर नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
14 जून रोजी सुशांतसिंह राजपूतने त्याच्या वांद्रे स्थित घरात गळफास लाऊन आत्महत्या केली होती. यानंतर त्याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करण्यात आल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला होता. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने हे गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. यानंतर बिहार पोलिसांनी संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदवला होता. सध्या ईडीकडून सुशांतच्या कंपनी संदर्भातील आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू आहे. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते. यानंतर संबंधित रक्कम विविध चार बँकांच्या खात्यात वळवण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त होते. अशातच आता मुंबई पोलिसांकडे आलेला फॉरेन्सिक ऑडिट अहवाल महत्त्वाचा मानला जात आहे.
या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये सुशांतसिंहने तीन वेगवेगळ्या बँकेत खाते उघडल्यापासून संपूर्ण व्यवहार फॉरेन्सिक ऑडिट टिमने तपासला होता. यात कोणत्याही ठिकाणी मोठ्या पैशांची अफरातफर झाली नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.