मुंबई - परदेशातून आयात होणाऱ्या स्कॉच, व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे परदेशी मद्याच्या किमतीत घट होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना देखील सरकारकडून जारी करण्यात आली आहे.
महसूल 250 कोटीपर्यंत वाढणार -
कोरोनामुळे राज्य शासनाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाल्याने विकास कामे खोळंबली आहेत. अनेक प्रकल्प रद्द केले आहेत. त्यामुळे आता उत्पन्न वाढीवर शासनाने भर दिला आहे. राज्य शासनाला दरवर्षी आयात केल्या जाणाऱ्या ‘स्कॉच’च्या विक्रीतून 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता विदेशी दारूवर 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदेशी स्कॉच, व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. दारूचे उत्पादन शुल्क उत्पादन खर्चाच्या 300 वरुन 150 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.
दारू तस्करी व बनावट दारू विक्रीला बसणार आळा -
सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने स्कॉचची आयात वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच सरकारचा महसूल 250 कोटीपर्यंत वाढू शकतो. दारुच्या तस्करीला आळा बसेल. उत्पादन शुल्क अधिक असल्याने चोरी-छुप्या मार्गाने राज्यात विदेशी दारु येत होती. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्याने इतर राज्यांतून महाराष्ट्रात होणारी ‘स्कॉच’ची तस्करी, तसेच बनावट दारुच्या विक्रीलाही आळा बसेल, असा शासनाचा दावा आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. तसेच लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.