मुंबई - रेल्वेचा फूटबोर्ड आणि फलाट यांच्यामध्ये असलेली पोकळी दरवर्षी शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. २०१४ मध्ये घाटकोपर येथे मोनिका मोरे या तरुणीस हात गमवावे नंतर मुंबई हायकोर्टाने या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश दिले होते. मात्र ७ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील असेलेल्या अनेक फलाटाची उंची वाढली नाही. त्यामुळे वयोवृद्ध आणि महिलांना चढतांना व उत्तरतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेचा कारभारावर आज प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेत रेल्वेला मुंबईच्या रेल्वे स्थानकांची उंची वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डाने साधारण ३ वर्षाच्या कालावधी मागितला होता. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील फलाटांची उंची वाढण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा रेल्वे स्थानकाची उंची वाढविण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आज कित्येक रेल्वे स्थानकांची उंची वाढली नाही. याबाबद रेल्वे प्रवासी संघटनेने सुद्धा ही बाब रेल्वेचा लक्षात आणून दिली होती. मात्र, रेल्वे वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केला आहे. डोंबिवली,आठगाव, खर्डी सारख्या अनेक रेल्वे स्थानकावरील फलाटावर १ ते २ फुटाची पोकळी आहे. कित्येक वेळा यामुळे रेल्वे अपघात झाले आहे. त्यामुळे रेल्वेने तत्काळ याची दखल घेऊन युद्धपातळीवर स्थानकांची उंची वाढवावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
'रेल्वेने याकडे लक्ष दिले नाही'
मध्य रेल्वेवरील कुर्ला, डोबिवली, सँडहर्स्ट रोड, मशीद बंदर, चेंबूर, कर्जत या स्थानकांवर गेल्या अनेक दिवसांपासून फलाट आणि लोकलमधील अंतर कमी करण्यासाठी प्रवाशांकडून मागणी होत असताना रेल्वे प्रशासन मात्र फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी या अंतरामुळे प्रवासी गाडीतून स्थानकात उतरताना अथवा घाईच्या वेळेत धावत रेल्वे पकडताना प्रवासी घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहे. रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी ईटीव्ही भारताला सांगितले, की कुर्ला रेल्वे स्थानकावरील काही फूटबोर्ड आणि फलाटमध्ये पोकळी असल्याची तक्रारी रेल्वेकडे केलेल्या होत्या. मात्र, नंतर लॉकडाऊन लागल्याने रेल्वेने याकडे लक्ष दिले नाही. मात्र, आता लोकल पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. आम्ही प्रवासी संघाकडून याबाबद पाठपुरावा करणार असल्याचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
'हे' आहे कारण
रेल्वेच्या सेवेत असलेल्या पूर्वीच्या डीसी लोकलच्या डब्यांची उंची कमी होती. त्यामुळे सर्व फलाटांची उंचीही त्यानुसार ठेवण्यात आली होती. पण गेल्या काही वर्षात रेल्वेच्या ताफ्यात नवीन लोकल आल्या आहेत. या लोकलच्या प्रत्येक डब्याखाली असणाऱ्या आधुनिक स्प्रिंगमुळे वेगात असलेल्या लोकलना हादरे बसण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. पण या स्प्रिंगची उंची जास्त असल्याने या लोकलची उंची अधिक असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रेल्वे अधिकारी म्हणतात आवश्यक असल्यास कारवाई करू
मुंबईकर आज स्वतःचा जीव हातात घेऊन प्रवास करावे लागते आहे. मध्य रेल्वेच्या कित्येक प्लॅटफॉर्मवर 1 ते २ फुटाची पोकळी आहे. कित्येक वेळा यामुळे रेल्वे अपघात झाले आहे. त्यामुळे किती तरी नागरिकांना आपला जीव गमवावे लागले आहे. फलाटांची उंची वाढवण्याच्या कामांना गती न दिल्यामुळे मध्य रेल्वे आमच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप काही प्रवाशांकडून करण्यात आला आहे. याबाबत रेल्वेला विचारणा केली असताना सांगितले की, रेल्वेने सांगितले की, आम्ही जिथे जिथे फूटबोर्ड आणि फलाट यांच्यामध्ये असलेली पोकळी जास्त आहे. तिथे फलाटाची उंची वाढत आहे.
हेही वाचा - Two Wheeler Accident Washim : दुचाकीसमोर अचानक आली निलगाय.. अपघातात एक जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी