मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार कमी होत असतानाच डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ११ वर गेली आहे. मुंबईत आढळून आलेल्या डेल्टा प्लस रुग्णांपैकी एका ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूनंतर जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्याचे अहवाल आले असून त्यात तिला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या महिलेला लसीचे दोन डोस देण्यात आले होते. डेल्टा प्लसचा हा मुंबईतील पहिला मृत्यू आहे.
हेही वाचा - राजीव गांधी जयंती : राज्यात सामाजिक ऐक्य पंधरवाडा
मिळालेल्या माहितीनुसार, एका ६३ वर्षीय वयोवृद्ध गृहिणी असलेली महिला २१ जुलै २०२१ रोजी कोविड पॉझिटिव्ह आढळली होती. तिला कोरडा खोकला, चव कमी होणे, अंगदुखी, डोकेदुखी आदी लक्षणे होती. २४ जुलै रोजी या महिलेला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तीला ऑक्सिजन देण्यात आले आणि स्टेरॉईड, रेमडेसिव्हीरसह उपचार देण्यात आले. मात्र, २७ जुलै रोजी या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट (AY.1 स्ट्रेन) ची लागण झाली होती, असे राज्य सरकारकडून काल ११ ऑगस्टला महापालिकेला कळवण्यात आले होते.
दोन डोस नंतर डेल्टा प्लस -
या महिलेला इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा रोग आणि अडथळा आणणारा वायुमार्ग रोग होता, ज्यासाठी ती कोविड संसर्गापूर्वी घरी ऑक्सिजन उपचार घेत होती. या महिलेने देशाबाहेर कोणताही प्रवास केला नव्हता. या महिलेला कोव्हिशिल्ड या लसीचे दोन डोसही देण्यात आले होते. त्यानंतरही या महिलेला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे समोर आले आहे.
६ जणांना कोरोना, २ जणांना डेल्टा -
ही वयोवृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच तिच्या संपर्कातील सर्वांचा शोध घेतला असता रुग्णाच्या जवळच्या संपर्कांपैकी ६ जण कोविड पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आढळलेल्या संपर्कांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. यात २ जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे स्पष्ट आले आहे. इतरांच्या निकालाची प्रतीक्षा केली जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रत्नागिरीत पहिला मृत्यू -
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरमधील एका ८० वर्षीय महिलेला डेल्टा प्लसची लागण झाली होती. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. जूनमध्ये या महिलेचा मृत्यू झाला होता. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतरही आजार होते. राज्यातील डेल्टा प्लस व्हेरियंटचा हा पहिला मृत्यू होता.
हेही वाचा - राज्यात कोरोना आटोक्यात येत असताना डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ; तिसरी लाट आल्यास पुन्हा लॉकडाऊन