मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार या ना त्या कारणावरून मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मग ही चर्चा कोविड काळातल्या भ्रष्टाचाराची असो, अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात असो किंवा वा मग ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या नेत्यांची असो. मात्र, सध्या चर्चा आहे ती महाविकास आघाडीतील नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोनची आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या मेसेजची. दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांना 18 फेब्रुवारी 2021 रोजी एक मेसेज आला होता. त्यामध्ये नाना पटोले यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. या घटनेची तक्रार अखेर नोंदवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
18 फेब्रुवारी 2021 रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मोबाईल फोनचा व्यत्यय नको म्हणून नाना पटोले यांनी आपला मोबाईल फोन आपल्या पीएकडे दिला होता. मीटिंग सुरू होती. याच दरम्यान नाना पटोले यांच्या मोबाईल फोनवर एका मेसेजची रिंग वाजली. त्यांच्या पीएने तो मेसेज पाहिला मेसेजमध्ये नाना पटोले यांना अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली होती. घडला प्रकार गंभीर होता. कोणीही सभ्य व्यक्ती या शिव्या ऐकल्यानंतर शरमेने मान खाली घालेल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घडल्या प्रकाराची तक्रार सायबर विभागाकडे देण्यात आली. सायबर विभागाने आपला तपास सुरू केला. आतापर्यंत करण्यात आलेला तपास आणि हे संपूर्ण प्रकरण सध्या सायबर विभागाने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहे.
मुख्यमंत्र्यांना आली होती धमकी -
या अगोदर देखील अशा स्वरूपाचे शिवीगाळ करणारे मेसेज आणि धमकीचे फोन महाविकास आघाडीच्या नेत्यांना आले होते. मागच्या वर्षी पलाश बोस नावाच्या एका व्यक्तींना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंडरवर्ल्डच्या नावे धमकी दिली होती. तसेच त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनादेखील धमकीचे फोन मेसेज केले होते. या प्रकरणाची तक्रार गांभीर्याने घेईल जुहू एटीएसने या व्यक्तीला अटक केली. प्रकरण शमले असे दिसत असताना पुन्हा एकदा अशा प्रकारचे शिवीगाळ करणारे आणि धमकी देणारे मेसेज आणि फोन महाविकासआघाडी त्या नेत्यांना येऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.