मुंबई - घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात कोविड बाधितांसाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याची माहिती महापालिकेला सायंकाळी ५ वाजता कळवण्यात आली. ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती मिळताच पालिकेने सव्वा तासात ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. पालिकेने ऑक्सिजन साठा संपण्याआधीच ऑक्सिजनचा पुरवठा केल्याने ६० रुग्ण सुरक्षित असल्याचे पालिकेकडून कळवण्यात आले आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा -
एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा रुग्णालयात एकूण ६१ कोविड बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये ५० जणांना ऑक्सिजन पुरवला जात आहे तर ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णालयाकडे सायंकाळी ६.३० पर्यंत पुरेल, इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेला कळवली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, एन विभागाचे सहायक आयुक्त अजित आंबी, वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) महेंद्र खंदाडे ह्यांनी तातडीने समन्वय साधून या रुग्णालयात वेळीच ऑक्सिजनचा साठा पोहोचवला.
वेळेआधी पोहचवला ऑक्सिजन -
महानगरपालिकेच्या एस विभागातून ९ जंबो सिलेंडर या रुग्णालयात सायंकाळी ६.१५ वाजता पोहचवले. त्या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या नियमित ऑक्सिजन पुरवठादाराने ४ ड्युरा सिलेंडर रुग्णालयात सायंकाळी ६.१५ च्या सुमारास पोहोचवले. ते जोडून त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखला गेला. त्यासोबत एन विभागातून देखील १५ जंबो सिलेंडर बॅकअप म्हणून त्वरित पाठवण्यात आले. एवढेच नव्हे तर, रुग्णांना स्थलांतरित करण्याची गरज भासली तर त्यासाठी रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सुदैवाने आणि महानगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याची आवश्यकता भासली नाही. हिंदू महासभा रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.
दरम्यान, हिंदू महासभा रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा संदर्भात भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून, रुग्णालयाच्या परिसरात व्यवस्था उभी करण्याविषयी एन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात उद्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनासमवेत तातडीची बैठक देखील होणार आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचतो आहे, ऑक्सिजनचा वापर योग्यरित्या आणि काटकसरीने होतो आहे, यावर महानगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. तातडीच्या प्रसंगासाठी उत्पादकांना लागलीच सूचित करून तत्परतेने ऑक्सिजन पोचविण्याची कार्यवाही केली जात आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
टेम्पो येताच डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या-
पण संध्याकाळचे साडेसहा वाजपर्यंत पुरवठा झाला नसता तर ६० रुग्णांचे जीव धोक्यात आले असते. पण म्हणतात ना दैव बलवत्तर आणि सव्वा सहा वाजेच्या सुमारास ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन येणारा टेम्पो आला. यावेळी रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. टेम्पो येताच डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. याठिकाणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या सुद्धा पोहचले होते.
हेही वाचा - भावासाठी केली ऑक्सिजनची तजवीज, पण अन्य रुग्णांची तडफड पाहून 'त्याने' सोडले प्राण