मुंबई - चित्रपट निर्माता अविनाश दास यांना आज (मंगळवारी) अहमदाबादच्या क्राईम ब्रांचने मुंबईतून अटक केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच फोटोवरुन दास यांना अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना अटक करण्यात आली होता. त्याच पूजा सिंघल आणि अमित शाह यांचा एकाच फ्रेममध्ये असलेला फोटो दास यांनी शेअर केला होता. त्यामुळे अमित शाह यांची प्रतिमा मलिन करण्याच्या आरोपांखाली दास यांना अटक करण्यात आली आहे. तसेच दास यांनी एका महिलेचा तिरंगा परिधान केलेला एक आक्षेपार्ह फोटोदेखील शेअर केला होता.
जामीन अर्जही फेटाळला : अविनाश दास यांना आपल्या अटकेची चाहूल लागली होती. त्यामुळे त्यांनी सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला होता. त्यामुळे दास यांनी गुजरात हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. पण तिथेदेखील दास यांना दिलासा मिळाला नाही. गुजरात हायकोर्टाने अविनाश दास यांचा अटक पूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला. त्यामुळे दास यांना अटक होणार असल्याचे निश्चित झाले. गुजरात हायकोर्टाने अविनाश दास यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अहमदाबाद क्राईम ब्रांच पोलीस अॅक्शन मोडवर आले. त्यांनी तातडीने दास यांना अटक करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरु केली. दास यांना अटक करण्यासाठी गुजरात क्राईम ब्रांचचे एक पथक मुंबईच्या दिशेला रवाना झाला. या पथकाने आज अविनाश दास यांना अटक केली.
अविनाश दास यांचे ट्विट? : अविनाश दास यांनी ट्विटरवर 8 मे रोजी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अटकेतील आयपीएस अधिकारी पूजा सिंघल आणि अमित शाह होते. संबंधित फोटो हा पूजा सिंघल यांना अटक करण्याच्या आधीचा असल्याचा दावा दास यांनी केला होता. तर ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पूजा सिंघल यांना अटक केली होती. तिच्या घरी टाकलेल्या रेडचे आणि त्यात मिळालेल्या पैशांच्या घबाडचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा - पश्चिम बंगाल: वडील आणि काकांकडून ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.. आईनेच केली तक्रार