मुंबई - कोरोनाच्या संकटात मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षी प्रमाणे मोठ्या स्वरूपात यंदा गणेशोत्सव साजरा होणार नाही. पण तरीही गणेशोत्सवात गणेश दर्शन आणि त्याबरोबरीने प्रसाद येणारच. त्यामुळे नियमानुसार मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून प्रसाद वाटपासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, त्याची जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण यंदा एफडीए 'ऑन द स्पॉट' अर्थातच स्वतः मंडळात येऊन परवानगीची प्रक्रिया करून देणार आहे. तर ऑनलाईन परवानगीचा पर्यायही मंडळासाठी उपलब्ध असणार आहे. पण मंडळांना प्रसाद वाटपासाठी एफडीएची परवानगी आवश्यक असणार आहे हे मात्र नक्की.
अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार रस्त्यावर वा कुठेही छोट्या वा मोठ्या स्वरूपात अन्न पदार्थांचे वितरण तसेच वाटप करण्यासाठी एफडीएची परवानगी आवश्यक आहे. शिळे वा निकृष्ट अन्न पदार्थांचे वाटप होऊ नये, विषबाधा होऊ नये यासाठी ही कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव मंडळांना प्रसाद वाटपासाठी एफडीएची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. या परवानगीशिवाय मंडळांना प्रसाद वाटप करता येत नाही. तर एफडीएच्या मार्गदर्शक तत्वानुसारच मंडळाना प्रसाद वाटप करावे लागते. मंडळांकडून सर्व नियमांचे पालन होते का यावर अन्न सुरक्षा अधिकारी करडी नजर दरवर्षी ठेवून असतात.
कोरोनामुळे यंदा अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हणत एफडीए गणेशोत्सवाच्या विशेष मोहीमेसाठी तयार झाले आहे. अधिकाऱ्यांच्या टीम सज्ज झाल्या असून त्या गणेशोत्सव मंडळाना भेटी देत प्रसाद कसा बनवला जात आहे याची पाहणी करणार असल्याची माहिती शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई, एफडीए यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे दरवर्षी मंडळांना प्रसाद वाटपासाठी परवानगी घेण्यासाठी एफडीए कार्यालयात जावे लागते. अन्यथा ऑनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागते. यंदा मात्र कोरोनाच्या संकटात मंडळाची संख्या कमी झाली आहे. मंडळांचा त्रास कमी करण्यासाठी आमचे अधिकारी मंडळांकडे जाऊन तिथेच परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून देतील अशी ही माहिती केकारे यांनी दिली आहे.
मुळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार सर्व मार्गदर्शक तत्त्वे त्यांना आखून देण्यात आली आहेत. हा सण व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी मंडळांनी स्वतः प्रसाद बनवावा, कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून प्रसाद घेऊ नये वा त्याचे वाटप करू नये असे अनेक मार्गदर्शक तत्त्वे मंडळांसाठी असणार आहेत.
मंडळांसाठीची मार्गदर्शक तत्वे..
- प्रसाद करण्याची जागा स्वच्छ असावी.
- प्रसादासाठीची भांडी स्वच्छ, आरोग्यादायी, झाकण असलेला असावीत.
- प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्न पदार्थ परवानाधारक-नोंदणीकृत दुकानातुनच खरेदी करावा.
- फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी परवानाधारक दुकानातुनच करावी.
- कच्चे, सडलेली फळे वापरू नयेत.
- आवश्यक तेवढाच प्रसाद तयार करावा.
- प्रसादासाठी लागणारे पाणी स्वच्छ- शुद्ध असावे.
- प्रसाद उत्पादन आणि वितरण करणारा स्वयंसेवक कुठल्याही संसर्गजन्य आजारापासून मुक्त असावा.
- खवा-मावा ताजा वापरावा, भेसळयुक्त मावा नाही ना याची खात्री करून घ्यावी.
- एफडीएला सहकार्य करावे.
प्रसादासंदर्भात काहीही संशय वाटल्यास एफडीएला कळवावे असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून करण्यात आले आहे.