मुंबई - मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज(रविवारी) ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत होता. त्याचवेळी जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महदनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली.
शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष. त्या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण सुरू होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शेतकरी सुनील गुजर यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतीत मोठं नुकसान झाले आहे. घर गहाण ठेवले आहे. घरची परिस्थिती बेताची झाल्याने आत्महत्येचा पर्याय निवडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्याने अचानक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेऊन त्याला आत्मदहन करण्यापासून रोखले. त्यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शेतीच्या नुकसाीचे कारण आणि आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याचे कारण त्या शेतकऱ्याने दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.