मुंबई- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सेफ्टी किट कमी आहेत. हे सेफ्टी किट विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करावी,असे आवाहन करण्यासाठी एक पत्र रुग्णालयाकडून काढण्यात आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, हे पत्र खोटे असून असे रुग्णालयाकडून कोणतेही आवाहन करण्यात आले नसल्याचे रुग्णालय आणि पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. पालिकेच्या व खासगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पालिका रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज, पर्सनल प्रोटेक्शन सेफ्टी किट मिळत नाहीत म्हणून ट्रॉमा केअर, शताब्दी, व्ही.एन. देसाई रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केली आहेत. या घटना ताज्या असतानाच परेलच्या केईएम रुग्णालयाचे सेफ्टी किट नसल्याने दानशूर नागरिकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.
व्हायरल पत्राबाबत केईएमचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे मास्क, ग्लोज, पर्सनल प्रोटेक्शन सेफ्टी किट योग्य प्रमाणात आहेत. या पत्रात खाते क्रमांक बरोबर देण्यात आलेला आहे. मात्र हा खाते क्रमांक आम्ही फ्रीझ केला आहे. त्यामुळे कोणी पैसे टाकले तरी ते त्या अकाऊंटमध्ये जमा होणार नाहीत. हे पत्र कोणी काढले हे मला माहीत नाही. रुग्णालयाकडून असे आवाहन केलेले नाही. या पत्राबाबत पोलिसांकडे तक्रार करायची का याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. पालिकेच्या आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासनानेही हे पत्र खोटे असल्याचे म्हटले आहे.