मुंबई - भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे व युद्धसामग्रीचे सामान्य नागरिकांना जवळून दर्शन व्हावे, लष्कराचे कार्य व आव्हानांची ओळख तसेच शालेय मुलांना व युवावर्गाला लष्करातील विविध संधींची माहिती मिळावी, या हेतूने 'वीरशक्ती' प्रदर्शन भरवण्यात आले आहे. महाराष्ट्र सेवा संघाच्या सॅल्युट इंडिया उपक्रमातर्फे आजपासून (शुक्रवार) ते रविवार यादरम्यान मुलुंड (पूर्व) येथील वामनराव मुरांजन शाळेच्या पटांगणात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
हेही वाचा - 'गरज पडल्यास सेना-राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोबत घेऊ'
या प्रदर्शनात मुलांना भारतीय सैन्य दलाच्या विविध बंदुका, रायफल्स, ग्रेनेड लॉन्चर, रडार यंत्रणा, भव्य विमानभेदी तोफा जवळून पाहण्यास मिळत आहेत. भारतीय सैन्यातील जवान या सर्व हत्यारांची मुलांना इत्यंभूत आणि त्यांना समजेल, अशा भाषेत माहिती करून देत आहेत. त्याचबरोबर भारतीय सैन्यांनी लढलेले युद्ध, त्यात सर्वोच्च कामगिरी बजावणाऱ्या सैनिकाची माहिती देखील देण्यात येत आहे. तसेच ड्रोनचे प्रात्यक्षिक आणि आर्मीच्या ट्रेनिंगचा थरार या मुलांना अनुभवता येत आहे.
पुढील दोन दिवस अजून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. ५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी या प्रदर्शनाला उपस्थित राहणार असून नागरिक देखील उपस्थित राहतील. पहिल्याच दिवशी हे प्रदर्शन पाहण्यास मुंबईमधील हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.