मुंबई - ब्रिटिश सरकारने 'ग्रेट इंडियन पेनिंन्सुल' (जी.आय.पी) या रेल्वे कंपनीच्या उत्तराधिकारी असलेल्या मध्य रेल्वेच्या स्थापनेला आज ७० वर्षे पूर्ण झाले असून मध्य रेल्वे ७१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य रेल्वेचा स्थापना दिनाचा संदेश देताना मध्य रेल्वेच्या ७१ व्या स्थापना दिनानिमित्त रेल्वे प्रवासी, वापरकर्ते आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
असा आहे गौरवशाली इतिहास -
1844 साली मुंबईचे आद्यशिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांनी देशात आगगाडी सुरु करावी, असा प्रस्ताव ब्रिटिशांकडे मांडला होता. त्यांच्या याच प्रस्तावाला मान्यता देऊन 31 ऑक्टोबर 1850 रोजी ब्रिटिश सरकारने 'ग्रेट इंडियन पेनिंन्सुल' (जी.आय.पी) या रेल्वे कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने 56 किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट दिले होते. 16 एप्रिल 1853 चा दिवस उजाडला आणि भारतातील पहिली रेल्वे मुंबईत धावली. त्यानंतर जसजशी वर्षे उलटली, तसतशी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला. १९०० मध्ये जीआयपी रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली. अशा प्रकारे, बॉम्बेद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. जीआयपीचे रूट मायलेज रेल्वे १ हजार ६०० होती. अर्थात २ हजार ५७५ किलोमीटर रेल्वेचे जाळे विस्तारले होते.
मध्य रेल्वेत पाच विभाग -
५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली होती. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१५१ मार्ग किमीवर पसरलेले असून एकूण ४७१ स्थानके आहेत.
७० वर्षांत मध्य रेल्वेचे अनेक विक्रम -
मध्य रेल्वेने गेल्या ७० वर्षांत अनेक कामगिऱ्या सर्वप्रथम केल्या आहेत. ज्यामध्ये पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस आणि गेल्या वर्षी पहिली किसान रेलचा समावेश आहे. मध्य रेल्वे विकासात सतत आघाडीवर आहे. मूळ लोडिंग जी निर्मितीच्या वेळी १६.५८ दशलक्ष टन होते, तीच आता २०२०-२१ मध्ये ६२.०२ दशलक्ष टन झाले आहे. २०२१-२२ या वर्षात एप्रिल-ऑक्टोबरमध्ये ४१.०२ दशलक्ष टन मालवाहतुकीचे आतापर्यंतचे सर्वोच्च प्रमाण गाठले. उपनगरीय सेवा देखील १९५१ मधील ५१९ वरून २०२१ मध्ये १,८१४ पर्यंत वाढल्या आहेत.
मध्य रेल्वेवर लोकलचा विस्तार -
मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून आज चार मार्गिका आहेत. ३ डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, 12 डब्यांच्या आणि 15 डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी एसी उपनगरीय सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वेमार्ग बांधणे, दुहेरीकरण, अनेक ठिकाणी ३रा रेल्वेमार्ग, विद्युतीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.
रेल्वेने अनेक संकटाचा केला सामना -
मध्य रेल्वेनेही अनेक संकटांचा सामना केला आहे आणि ती मजबूत झाली आहे. मुसळधार पाऊस असो, २६x११ दहशतवादी हल्ला असो किंवा कोविड-१९चे गंभीर आव्हान असो, आमच्या समर्पित कर्मचाऱ्यांनी या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.
हेही वाचा - स्वस्तामध्ये मिळतोय एलपीजी कंपोझिट सिलेंडर, 'अशी' होती ग्राहकांची धूळफेक