मुंबई - गेल्या वर्षभरापासून स्वतःच्या जिवाची काळजी न करता, अहोरात्र एसटी महामंडळाचे रक्षण करणारे 1 हजार 300 खासगी सुरक्षा रक्षक गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाविना काम करत आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न या सुरक्षा रक्षकांना पडला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन एसटी महामंडळाकडून वेतनासाठी तात्काळ सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीला निधी देण्यात आला आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे, एसटीचे स्पेअर पार्ट, डिझेल अशा अनेक खर्चांची देणी बाकी आहेत. तसेच, एसटी महामंडळाला सुरक्षा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीची देणी थकीत असल्याने, गेल्या तीन महिन्यांपासून 1 हजार 300 सुरक्षा रक्षकांचे वेतन मिळालेले नव्हते. यामुळे हे सर्व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले होते. 'ईटीव्ही भारत'ने याबाबद वृत्त प्रकशित केले होते. तसेच हा विषय लावून धरला होता. त्यामुळे एसटी महामंडळाने यांची दखल घेतली आहे. एसटी महामंडळाने सुरक्षा रक्षक पुरवठा करणाऱ्या कंपनीला बिलाचे पैसे दिले आहोत. त्यामुळे आता सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महामंडळात 1 हजार 600 सुरक्षा रक्षक
राज्यभरात एसटी महामंडळाचे जाळे आहे. 18 हजार बसेसचा ताफा, 250 आगार, 500 पेक्षा जास्त बस स्थानके आणि वर्कशॉप आहेत. यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी, 1 हजार 600 सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर आहे. त्यापैकी 300 राज्याच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे आणि 1 हजार 300 सुरक्षा रक्षक एका खासगी कंपनीचे आहेत. या 1 हजार 600 सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर महिन्याला सुमारे साडेतीन कोटी रुपये एसटी महामंडळाकडून खर्च करण्यात येतो. 15 कोटी रुपये संध्या महामंडळाकडे थकीत होते. त्यामुळे सुरक्षारक्षकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून मिळालेले नव्हते. याबाबत कामगार कल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना 'ईटीव्ही भारत'ने विचारणा केली होती. त्यांनी देखील बातमीची दखल घेऊन, थकीत वेतन मिळून देण्यासाठी पाठपुरावा केला होता.
'ईटीव्ही भारत'मुळे सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला - श्रीरंग बरगे
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, 'ईटीव्ही भारत' न्यूज नेहमी कामगारांच्या समस्यावर प्रकाश टाकत असते. आज 'ईटीव्ही भारत'मुळे एसटी महामंडळातील सुरक्षा रक्षकांना न्याय मिळालेला आहे. तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यासाठी आम्ही 'ईटीव्ही भारत'चे आभार मानतो. आम्ही नेहमीच आऊट सोर्सिंग संकल्पनेला विरोध केला आहे. बाहेरचे सुरक्षा रक्षक घेण्यापेक्षा आमच्या चालक व वाहक, तसेच यांत्रिकी कामासाठी वैद्यकीय कारणास्तव अपात्र कर्मचाऱ्यांचा सुरक्षा रक्षक म्हणून उपयोग करावा, मात्र, एसटी महामंडळाने आऊट सोर्सिंगचा सपाटा लावलेला आहे. परिणामी खासगी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार'