मुंबई - राज्यात डिसेंबरपासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने राज्यातील शाळा ४ जानेवारीला बंद करण्यात आल्या. शाळा १५ फेब्रुबारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार होत्या. मात्र कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आज पासून १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती देतील त्याच विद्यार्थ्यांना शाळेत शिकवले जाणार आहे तर इतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे.
शाळा बंद, शाळा सुरू -
राज्यात मार्च २०२० ला कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्याने ४ ऑक्टोबर २०२१ पासून इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. रुग्ण आटोक्यात येत असल्याने त्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरु झाल्या. मात्र त्यानंतर ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने पुन्हा ४ जानेवारी २०२२ पासून शाळा पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे जाहिर करण्यात आले होते. सद्या कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने राज्य सरकारने आता पुन्हा इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना शाळांत प्रवेश देतेवेळी पालकांचे संमतीपत्र आवश्यक असणार आहे.
काय आहेत मार्गदर्शक सूचना -
पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतचे वर्ग २४ जानेवारीपासून सुरू करण्यात यावेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून संमती पत्र घ्यावे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती पत्र देणार नाहीत त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे. सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे. शाळा सुरू करणे व कोविड नियमाच्या पालनाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल. पालिका शाळांचे सहाय्यक आयुक्तांच्या मदतीने सॅनिटायझेशन करावे. शाळेतील कोव्हिडं सेंटर, विलगिकरण केंद्र, लसीकरण केंद्र इतर ठिकाणी स्थलांतरित करावे. इतर शाळांनी स्वतःचे सॅनिटायझेशन करून घ्यावे. कोव्हिडं सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोव्हिडं लसीकरण प्रमाणपत्र तपासणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा शाळेच्या कामासाठी परत बोलवावे. सर्व शाळा पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे.