मुंबई - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये उच्च शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षण हे महत्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे जे विद्यार्थी शैक्षणिक संस्थापासून दूर अंतरावर वास्तव्यास असतात किंवा वैयक्तिक जबाबदार्यांमुळे नियमित महाविद्यालय किंवा विद्यापीठात उपस्थित राहू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन माध्यमातूनच शिक्षण सुरू आहे. त्याला विद्यार्थी व शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे महाविद्यालय किंवा विद्यापीठापासून दूर राहत असलेले विद्यार्थी सध्या ऑनलाईन वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे भविष्यात ऑनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यामुळे शैक्षणिक संस्थांपासून दूर राहणार्या विद्यार्थ्यांबरोबरच वैयक्तिक जबाबदार्यांमुळे नियमितपणे विद्यापीठ किंवा महाविद्यालयात उपस्थित राहू न शकणार्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेणे सोयीस्कर होईल. त्यामुळे महाराष्ट्रात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी या मागणीचे निवेदन युवासेनेकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. यावेळी कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, डॉ. सुप्रिया करंडे, अॅड. वैभव थोरात, शशिकांत झोरे आणि युवासेना सहसचिव अॅड. संतोष धोत्रे आदी उपस्थित होते.