मुंबई - औरंगाबाद येथील खाम नदी पुनरुज्जीवीत करण्यात येत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कामांचा शुक्रवारी आढावा घेतला. या नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी राज्य शासनाकडून आर्थिक पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
पर्यावरणीय वैशिष्ट्य जपा-
नदीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या कामांची मंत्री ठाकरे यांनी माहिती घेतली. यावेळी कामाच्या प्रगतीबाबत सादरीकरण यावेळीकरण्यात आले. नदीचे पुनरुज्जीवन करत असताना त्याचे पर्यावरणीय वैशिष्ट्य जपत या कामामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी केले.
या नदीचे ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहे. नदीच्या पर्यावरण अनुरुप पुनरुज्जीवनासाठी संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. नियमितपणे बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा पाठपुरावा करावा, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी दिल्या. दरम्यान, थोड्याच काळावधीत नदीच्या पुनरुज्जीवनसाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे ठाकरे म्हणाले.
आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता पानझडे, एसडब्ल्यूएमचे प्रभारी बोंबे, इकोसत्त्वच्या नताशा जरीन, गौरी मिराशी यांच्यासह स्मार्ट सिटी टीममधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.