मुंबई - महापालिका क्षेत्रातील मल्टिप्लेक्स, सिनेमागृहामधील प्रत्येक शोसाठी महापालिका नाममात्र करमणूक शुल्क आकारात आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने पालिका प्रशासन त्यामध्ये ५ ते ६ पट वाढ करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार मराठी नाटकांच्या करमणूक शुल्कात ५ ते ६ पट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेना काय निर्णय घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
म्हणून शुल्कात वाढ -
मल्टिप्लेक्समध्ये एकाच इमारतीत अनेक पडद्यांवर एकाच वेळी सिनेमांचे अनेक शो सुरू असतात. या सिनेमागृहांमध्ये तिकीट हे २०० रुपयांपासून १५५० रुपयांपर्यंत असते. मात्र या शोसाठी केवळ ६० रुपये शुल्क आकारले जाते. करमणूक शुल्क नाममात्र असल्याने प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी १ हजार रुपये कर आकारण्याचा प्रस्ताव मांडल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी नाही -
पालिकेने २०१५मध्ये मल्टिप्लेक्ससाठी स्वतंत्र श्रेणी तयार करून प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी ६६ रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रस्ताव पालिकेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र राज्य सरकारकडून अद्याप या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यातच आता प्रशासनाने सुधारीत कर प्रस्तावित केला आहे.
बंदिस्त, खुल्या जागेतील कार्यक्रमांनाही करवाढ
बंदिस्त जागेत अथवा खुल्या मैदानात होणार्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सव, करमणुकीच्या आणि इतर कार्यक्रमांचा करही ३३ रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
मराठी नाटकांनाही करमणूक कर
मराठी आणि गुजराती नाटकांसाठी महानगर पालिकेकडून करमणूक कर वसूल केला जात नाही. मल्टिप्लेक्स बरोबरच सर्व प्रकारच्या सिनेमागृहांचे, नाटक, जलसा आणि करमणुकीच्या इतर कार्यक्रमाचे तसेच, सर्कस, आनंद मेळा यांच्या शुल्कातही ५ ते ६ पट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे.
अशी होणार करवाढ
सुपर डिलक्स मल्टिप्लेक्ससाठी सध्या ६० रुपये करमणूक शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क आता १००० केले जाणार आहे. वातानुकूलित सिनेमागृह मल्टिप्लेक्ससाठी सध्या ६६ रुपये करमणूक शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क आता २०० रुपये केले जाणार आहे. विना-वातानुकूलित सिनेमागृहासाठी सध्या ५० रुपये करमणूक शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क आता १५० रुपये केले जाणार आहे. नाटक, जलसा, करमणुकीचे इतर कार्यक्रमासाठी २८ रुपये करमणूक शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क आता १०० रुपये केले जाणार आहे. सर्कस, आनंदमेळासाठी ५५ रुपये करमणूक शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क आता १०० रुपये केले जाणार आहे. ५ हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थितीसाठी ३३ रुपये करमणूक शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क आता १०००० रुपये केले जाणार आहे. बंदिस्त किंवा खुल्या जागेत होणार्या कार्यक्रमासाठी इतर करमणूक कार्यक्रमांसाठी ३३ रुपये करमणूक शुल्क आकारले जात होते, ते आता १२० रुपये आकारले जाणार आहे.