मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांनी दिली आहे. जयश्री पाटील यांनीच सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात कारवाई केली होती.
ईडीकडून लूकआऊट नोटीस -
१०० कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.
हे ही वाचा -खूशखबर! काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे ५ हजार तिकिटे शिल्लक
दरम्यान अनिल देशमुख यांच्या शोधासाठी 'ईडी'ने आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. 'ईडी'ची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. आता लूकआऊटमुळे लवकरच परराज्यातदेखील 'ईडी'कडून शोध सुरू होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा - देशी जुगाड.. भंगारातील साहित्यापासून बनविले फवारणी यंत्र, केवळ 100 रुपयात पाच एकरात फवारणी
काय आहे प्रकरण -
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याआधारे सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासान्वये 'ईडी'नेसुद्धा पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत 'ईडी'ने आत्तापर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी 'ईडी'ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.