मुंबई - अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने मुंबईत छापेमारी केली ( ED Raids in Mumbai ) आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ई़डीच्या 6 पथकाकडून ही छापेमारी सुरु आहे. मागील आठवड्यात सुद्धा ईडी आणि एनआयएने संयुक्तरित्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारासंदर्भात छापेमारी केली होती.
एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Don Dawood Ibrahim ) पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईसह भारतात अनेक ठिकाणी दहशतवाही कारवाया करण्यासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग च्या माध्यमातून हवालामार्फत पैशाची देवाणघेवाण झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर ईडीने धडक कारवाई सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत या धाडी होत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात ईडीने मुंबईतील दहा ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर सह गँगस्टर छोटा शकील याच्या जवळच्या व्यक्तींवर हे छापे मारण्यात आले होते. तेव्हा ईडीने सलीम फ्रुट याला ताब्यात घेत 9 तास चौकशी केली होती. त्या चौकशीतून काही महत्वाच्या बाबी समोर आल्या होत्या. त्यानंतर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीने ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येतेय - देवेंद्र फडणवीस