मुंबई - मनसुख हिरेन खून प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ( Encounter specialist Pradip Sharma ) हे मनसुख हिरेनच्या हत्येचा ( Mansukh Hiren Murder Case ) मुख्य सूत्रधार असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल ( NIA affidavit in Mansukh Hiren Murder Case ) करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेनच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुढील सुनावणी 17 जुलै रोजी - प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्ताच्या इमारतीत रचण्यात आला होता. जिथे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते. सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख दिले होते. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएने दाखल केलेले प्रतिज्ञापत्रत माहिती देण्यात आलेली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १७ जुलै रोजी ठेवली आहे.
हिरेन यांचा सापडला होता मृतदेह - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवून अंबानी कुटुंबाला घाबरवण्याच्या मोठ्या कटात हिरेन हा कमकुवत दुवा मानला जात होता. एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या प्रकरणातील इतर आरोपींसह शर्मा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात अनेक बैठका घेतल्या जेथे कथित कट रचला गेला. शर्माच्या जामीन अर्जाला एनआयएने विरोध केला. शर्माने गुन्हेगारी कट खून आणि दहशतवादी कृत्ये यासारखे गुन्हे केले आहेत. न्यायमूर्ती ए.एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी.ए. सानप यांच्या खंडपीठाने याचिकेवर पुढील सुनावणी 17 जुलै रोजी ठेवली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटक असलेले एसयूव्ही वाहन सापडले होते. या वाहनाचा मालक हिरेन असून तो गेल्या वर्षी 5 मार्च रोजी ठाण्यातील मुंब्रा खाडीत त्याचा मृतदेह सापडला होता.
प्रतिज्ञा पत्रात एनआयएचा दावा - एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, प्रदीप शर्मा हा टोळीचा सक्रिय सदस्य होता. ज्याने अंबानी कुटुंबासह लोकांना दहशत माजविण्याचा कट रचला आणि मनसुख हिरेनची हत्या केली. कारण तो कटातील कमकुवत दुवा होता. हिरेनला संपूर्ण कटाची माहिती होती. जसे की अँटिलियाच्या बाहेर कार पार्क करण्याशी संबंधित. शर्मा आणि वाझे यांना भीती होती की हिरेन ही माहिती लिक करु शकतो. ज्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. यामुळेच त्याची हत्या केल्याचा दावा NIAने केला आहे.
हिरेनने आत्महत्या केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न - प्रदीप शर्माला NIA ने 17 जून 2021 रोजी अटक केली होती आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यात प्रदीप शर्माचा थेट सहभाग असल्याचे जमवलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याचे दिसते. एनआयएच्या म्हणण्यानुसार हिरेनने अँटिलियाच्या बाहेर कार पार्क करण्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मोठ्या कटात अंबानी कुटुंब आणि स्थानिक लोकांना घाबरवण्यासाठी अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांसह वाहन पार्क करणे आणि जैश-उल-हिंदच्या नावाने धमकीची पत्रे पाठवणे यांचा समावेश आहे. एनआयएने सांगितले की आरोपींनी हिरेनने आत्महत्या केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.
काय आहे प्रकरण - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटके सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथके घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळले होते.
हेही वाचा - Shivsena vs BJP : 'बाळासाहेब ठाकरेंवरून विरोधकांचा शिवसेनेवर निशाणा!'