मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने आज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ( Tata Institute of Social Science ) या संस्थेबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ( Tata Institute of Social Science ) या नामांकित संस्थेच्या स्कूल ऑफ प्रोफेशनल एज्युकेशन विभागाद्वारे मुकेशनाल एज्युकेशन मध्ये यूजीसीच्या निकषानुसार पदविका आणि पदवी प्राप्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कशी असणार आहे प्रक्रिया? - यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावी नंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश करू शकतो या संस्थेने अभ्यासक्रमाकरिता 3750 उद्योगांसोबत करार केला असून विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर आवडीनुसार जॉब रोल निवडण्याची सोय आहे. सदर अभ्यासक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. यामध्ये प्रामुख्याने पारंपारिक अभ्यासासोबत टुरिझम अँड हॉस्पिट्यालीटी, माहिती तंत्रज्ञान, एंटरटेनमेंट, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील संधींचा समावेश आहे.
स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी - या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगारभिमुख शिक्षण उपलब्ध होणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून बारावी मध्ये गणित या विषयासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये कमवा आणि शिका पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या संधीचा समावेश आहे आतापर्यंत 34000 विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली असून सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा दावा शिक्षण मंत्री दीपक केसरकर ( Education Minister Deepak Kesarkar) यांनी केला आहे.