मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये ( money laundering case ) नवाब मलिक यांना ईडीकडून अटक ( Nawab Malik arrested by ED ) झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग करून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाविकासआघाडी सरकार वारंवार करत आहे. आज त्याच अनुषंगाने नवाब मलिक यांच्यावर झालेली ही कारवाई आहे, असे महा विकास आघाडी सरकारमधील नेते म्हणत आहेत. महा विकास आघाडीतील नेत्यांनी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सायंकाळी साडेसहा वाजता महत्त्वाची बैठक ( Meeting in MVA Leaders ) आयोजित केली आहे.
मुख्यमंत्री, शरद पवार, गृहमंत्री बैठकीला?
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. एकीकडे या सर्व घडामोडी होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेते व भाजपमधील नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या आहेत. केंद्रातील सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वारंवार दुरुपयोग करून राज्यातील सरकार पाडू इच्छित आहेत. असा आरोप महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी या अगोदरही केला आहे. मागच्या रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी चर्चा करण्यात आली होती. त्याचा प्रत्यय आज सुद्धा आला अशी चर्चा सुरू आहे.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार का?
नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे. विशेष करून कुठल्याही प्रकारे थांगपत्ता न देता. केंद्रीय तपास यंत्रांचा वापर वारंवार केला जात आहे आणि राज्यातील विशेष करून महा विकास आघाडी सरकारमधील ने त्यांवरच अशा पद्धतीची कारवाई सुरू असल्याने यावर ठोस पावलं कशा पद्धतीने उचलली पाहिजेत याविषयी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी ड्रग्स प्रकरणांमध्ये एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात बाजू लावून धरत अनेक प्रकरणे समोर आणली होती. या सर्व प्रकरणाचा राग मनात धरून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. त्याचबरोबर नवाब मलिक यांना कुठलीही कल्पना न देता त्यांना अशा पद्धतीने अटक करणे कितपत योग्य आहे याविषयी चर्चा होईल.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी?
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून जोर लावून धरली जात आहे. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. आता नवाब मलिक यांच्या संदर्भामध्ये त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो का याविषयी सुद्धा या बैठकीत चर्चा होईल. परंतु जर घाईघाईत यांचा राजीनामा घेतला तर चुकीचा संदेश जनतेमध्ये जाऊ शकतो असाही एक मतप्रवाह आहे. म्हणूनच सध्या तरी नवाब मलिक यांच्या बाबतीत महाविकासआघाडी मधील नेते वेट अँड वॉचची भूमिका घेणार आहेत असे दिसते.