मुंबई - शहरातील लाखो ग्राहकांना मुंबईबाहेरून वीज तयार करून विविध वीज कंपन्याद्वारे वीज पुरवठा केला जातो. मात्र आज ग्रीड फेलीयरमुळे मुंबईसह बाजूच्या जिल्हयातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबईत शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानी तर भांडुप व मुलुंड येथे एमएसईबी या वीज कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. ही वीज मुंबईबाहेर बनवून या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना पुरवली जाते. आज मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या ग्रिडमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रिड फेल्युअर झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लोकल-रस्ते वाहतूक सेवेवर परिणाम..
मुंबई आणि उपनगरातील लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. सकाळी दहा वाजेपासून मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाली आहे. यासोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही याचा फटका बसला आहे. लोकल अचानक मध्येच थांबल्यामुळे रुळांवरुन चालत जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
मुंबईतील रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम दिसून येत आहे. रस्त्यांवरील सिग्नल सेवा बंद झाल्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे.