मुंबई - महापालिका ( Municipal Corporation Elections Maharashtra ) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ( Local Body Elections Maharashtra ) पार्श्वभूमीवर तयार केलेल्या वॉर्ड पुनर्रचना राज्य सरकारने रद्द केल्या होत्या. आता पुन्हा राज्य सरकारने वॉर्ड पुनर्रचना ( New Ward Reorganization ) करण्याचे निर्देश महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. यामुळे आता निवडणुका लवकरच होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वॉर्ड पुनररचना - मुंबई महापालिकेची निवडणूक ( BMC Election 2022 ) फेब्रुवारी २०१७ ला झाली होती. ९ मार्च २०१७ ला महापौरांची निवड झाली. पालिकेचा ५ वर्षाचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ ला संपला. त्याआधी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. निवडणुका घेण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने पालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये ९ ने वाढ करून २३६ प्रभाग निर्माण करून त्यानुसार वॉर्ड पुनर्रचना करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने सूचना व हरकती मागवत वॉर्ड पुनर्रचना केली. मात्र त्याला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याने ती वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्यात आली.
मसुदे आधीच तयार - वॉर्ड पुनर्रचना रद्द केल्यावर सरकारने विधिमंडळात निवडणूक आयोगाच्या सहकार्याने वॉर्ड पुनर्रचना करण्याचा कायदा केला आहे. तसेच निवडणुकांच्या तारखा सरकार आयोगाच्या सहकार्याने जाहीर करणार आहे. यामुळे सरकारने आता महापालिकांना पत्र पाठवून शहरांच्या लोकसंख्येच्या आधारे प्रभाग सीमांकनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर पालिका लोकसंख्येच्या आधारावर नवीन मसुदा तयार करणार नाही, कारण ते मसुदे आमच्याकडे आधीच आहेत. पुन्हा नवीन मसुदा तयार करणे आणि सूचना आणि हरकती मागवणे योग्य होणार नाही. एक आधीचा व सूचना हरकती मागावल्यावर दुसरा मसुदा तयार असून, तो निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. यापैकी कोणता मसुदा मागितला जाईल तो पालिका आयुक्तांच्या आदेशाने आयोगाला सादर केला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
२७ लाख वाया - दरम्यान मुंबई महापालिकेने प्रभाग पुनर्रचना करण्यासाठी, त्यावर सूचना व हरकती मागवणे, त्याची सुनावणी घेणे, त्यासाठी नियोजन करणे ते मसुदे प्रसिद्ध करणे आदींवर २७ लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र सरकारने प्रभाग पुनर्रचना रद्द केल्याने हा खर्च वाया गेला आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे.
हेही वाचा : मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेविरोधात हरकतींचा पाऊस, ८१२ सूचना व हरकती