मुंबई - विद्यार्थी आणि शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अचूकरित्या समजावी आणि विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा विषेशतः पोषण आहार योजनेचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने महा स्टुडन्ट अॅप तयार केल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
उपस्थितीच्या अचूक नोंदीसाठी
कोरोना कालावधीत अजूनही शाळा ऐच्छिकरीत्या सुरू आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा पुन्हा एकदा सुरू होणार असल्या तरी अद्यापही शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची किती उपस्थिती राहील, याबाबत साशंकताच आहे. विद्यार्थ्यांना अद्यापही लस देण्यात आलेली नाही, तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट या पार्श्वभूमीवर शाळांमधील उपस्थिती हा प्रश्नच राहणार आहे. तरीही शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शाळेतील उपस्थितीची अचूक नोंद व्हावी, यासाठी महा स्टुडन्ट अॅप तयार केले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली.
काय असेल अॅपमध्ये?
आतापर्यंत कित्येक शाळांमध्ये विद्यार्थी अथवा शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जात होती. मात्र, आता यापुढे अचूक आणि योग्य माहिती मिळावी, यासाठी महा स्टुडन्ट अॅपद्वारे उपस्थिती नोंदवली जाणार आहे. अॅपच्या माध्यमातून ही माहिती सतत अद्ययावत केली जाणार आहे. हे अॅप येत्या आठवडाभरात राज्यातील सर्व शाळांमध्ये लागू करण्यात येणार असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.
अॅपचा फायदा काय?
महा स्टुडन्ट अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अचूक नोंदणी आणि उपस्थिती याची माहिती मिळणार आहे. यामुळे शालेय पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांना मिळाला अथवा नाही याबाबत स्पष्टता येणार आहे. तर कित्येक शाळांमध्ये पट वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी केली जाते. ही नोंदणी आता या अॅपमुळे करता येणार नाही. एका शाळेतील विद्यार्थ्यांची दुसऱ्या शाळेत नोंद होणार नाही, त्यामुळे बोगस पटनोंदणीला आळा बसणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवरही यामुळे चाप बसेल आणि शिक्षण क्षेत्राला शिस्त लागेल, असा विश्वास शिक्षण मंत्री गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.