मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, अकरावीची प्रवेशप्रक्रिया तूर्त ऑनलाइन घेणार असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिले. मात्र कोविडची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
'ऑनलाइन प्रक्रिया रद्द करावी'
आटोक्यात आलेल्या कोरोनाचा प्रसार राज्यात पुन्हा वाढू लागला आहे. अमरावती, अकोला, औरंगाबाद महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर केला आहे. रुग्ण वाढीमुळे ऑनलाइन प्रवेश दिला जात असला तरी, मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. तसेच ऑनलाइन प्रक्रियेमुळे रिक्त जागा वाढत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यामुळे प्रवेश मिळत नाही. त्याला आळा घालण्यासाठी औरंगाबाद येथे ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबवून ऑनलाइन प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली.
'कोविडची स्थिती पाहून निर्णय घेऊ'
कोविडमुळे रुग्ण वाढत आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेतली तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर ही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. कोरोनामुळे प्रवेश व शुल्क ऑनलाइन घेण्यात आले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. परंतु या जागा रिक्त राहू नये ही शासनाची भूमिका आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.